कधी कधी अनोळखीकडून ओळखीकडे होत असणारा प्रवास उलट दिशेने कधी सुरु होतो कळतही नाही.

Saturday, December 17, 2011

स्वप्नांची किमत

स्वप्नांची किमत
कोणी सांगू शकेल का ?
उघड्या डोळ्यांनी पाहिलेली
मनामध्ये सजलेली स्वप्न
जीवापाड जपलेली
पापणीआड दडलेली स्वप्न
भविष्याचा वेध घेणारी
वर्तमान सुंदर करणारी स्वप्न
लहानग्यांच्या भाव विश्वा तली
तारुण्याच्या धुंदितली
उतारवयातल्या समाधानातली स्वप्न
या स्वप्नांची किमत कोणी सांगू शकेल का?
मुळात या स्वप्नांची किमत करता येण शक्य आहे?
मला नाही वाटत
पण तरीही मोजायचीच असेल किमत स्वप्नांची
तर मोजून पहा ते अश्रू त्या डोळ्यांतून वाहणारे
जे डोळे मोडलेल्या स्वप्नांचे तुकडे
पापण्यांआड साठवतात
मोजून पहा ते अश्रू
पहा मोजता येतात का ते
आणि करा स्वप्नांची किमत
कळलीच जर कोणाला स्वप्नांची किमत कधी
तर सांगा मलाही

- जीवनिका

Monday, December 5, 2011

प्रकाशात उजळलेल्या घराकडे पाहिलं जात
प्रकाशाच्या कारणाकडे नाही
कारण प्रकाशाच्या कारणाकडे पहिल्याने
डोळे दिपतात. मानवी डोळ्यांची ते सहन करण्याची क्षमता नाही.
एखाद्या गोष्टीला चांगल्या दृष्टीने पाहिलं
म्हणजे उंची वाढते
त्या गोष्टीचीही आणि आपलीही.

Sunday, December 4, 2011

लहानपणी जेव्हा मुल रडत
तेव्हा त्याला शांत करण्यासाठी आई
त्याच लक्ष इकडे तिकडे वेधते.
मोठेपणीही काहीस तसच असत. आपल्या दुःखावर
फुंकर मारण्याचा प्रयत्न आपली लोक करतात.
खरतर लहानपणी आणि मोठेपणी बऱ्याच गोष्टी, भावना तशाच राहतात
फक्त त्याच स्वरूप बदललेलं असत
बाळबोधपणाकरून शहाणपणाकडे वळलेल असत ...

Saturday, December 3, 2011

स्वप्न प्रत्येकानेच पहावीत
तो अधिकार प्रत्येकालाच आहे
पणप्रत्येक स्वप्न पूर्ण झालच पाहिजे
असा अट्टाहास नको
कारण स्वप्न पाहायला पैसे पडत नाहीत
पण काही स्वप्न पूर्ण करायची म्हणजे
काहीतरी मोजाव लागत
स्वप्न पाहणार्यालाही आणि
ती पूर्ण करणाऱ्यालाही

Thursday, December 1, 2011

खांदा

माणसाला खांद्याची गरज काय
फक्त हे जग सोडून जातानाच असते?
खरी गरज तर
या जगातले घाव झेलल्यावर असते.
पण हे कुठे कोणाला कळतय
जिवंत माणसाला आधाराला एक खांदा मिळत नाही
आणि मेल्यावर चार चार मिळतात.
हा कुठला न्याय? हि कुठली रीत?

Monday, November 21, 2011

डाव

मुखवटा कुणीच ओढला नव्हता
पडदा तुझ्याच डोळ्यांवर होता
साद कुणीच घातली नव्हती
आवाज तुझ्याच मनाचा होता
वाट कुणीच दाखवली नव्हती
पाठलाग तूच केला होतास
डाव कुणीच मांडला नव्हता
मांडलेला डाव फक्त तुझाच होता
म्हणून
मोडला जरी डाव तरी
दोष कुणाला देऊ नकोस
पण पुन्हा नवा डाव मांडण्याची
तसदी मात्र घेऊ नकोस
पण सवयीचा गुलाम तू
मांडणारच डाव नवा
तेव्हा एक मात्र कर
नवा सवंगडी मात्र मागू नकोस

-जीवनिका

Sunday, November 6, 2011

तळ्यातल पाणी

तळ्यातल पाणी
त्याला झऱ्यासारख वाहण कुठे माहितीये?
सारख आकाशाकडे डोळे लावून बसत
त्याला जगाकडे पाहण कुठे माहितीये?

कधीतरी पाऊस येणार
थोड वाहायला शिकवून जाणार
याची ते वाट पाहत राहत
पण वाहायचंय वाहायचंय म्हणताना
त्याच वाहायच राहूनच जात
वाट पाहता पाहता आटण मात्र होत

मग नेमेची पावसाळा येतो
थोड वाहण देऊन जातो
पुन्हा तो गेल्यावर त्याच वाहण थांबत
पुन्हा डोळे लावून वाट पाहण होत
कारण वाहण म्हणजे नक्की काय
हे त्याला माहीतच कुठे असत?

काहींच जगण सुद्धा असंच असत
कुणीतरी येणार
जगण शिकवून जाणार
कुणीतरी येतही
जगण देऊन जातही
गेल्यावर पुन्हा वाट पाहणंही होत

पण खर जगण कसं होणार
कारण जगण म्हणजे काय
हे त्यांना माहित कुठे असत?

-जीवनिका

Friday, November 4, 2011

मला माझ्या अज्ञानातच थोड जगायचय

मला माझ्या अज्ञानातच थोड जगायचय

सापडलेला हीरा कि नुसता चकाकणारा दगड

ते नाही मला पाहायचंय

त्याच्या त्या चकाकण्याने

मला दिपून जायचंय

सत्य आणि भ्रम यातलं

अंतर पुसून टाकायचंय

मला माझ्या अज्ञानातच थोड जगायचय

थोड रेंगाळत चालत जायचंय

माझीच पावल मोजत जायचंय

त्यातसुद्धा मला थोड चुकायचंय

मला माझ्या अज्ञानातच थोड जगायचय

-जीवनिका

Thursday, November 3, 2011

चेहरा

जगात प्रत्येक जण रंग भूमीवरच पात्र रंगवत असतो
पण त्या पलीकडला खरा माणूस कुठे दिसतो?
तो चेहरा नेहमी लपलेला असतो
जो समाजाच्या चौकटींत बसतो
तोच मुखवटा प्रत्येकजण ओढतो
कालांतराने मुखवटा बदलतो
पण खरा चेहरा लपूनच राहतो
पण कधीतरी एखादा क्षण येतो
आणि चेहरा उघडा पडतो
दोन मुखवट्यांच्या अदलाबदलीच्या
दरम्यान घात होतो
काही काळापुरताच का होईना
खरा चेहरा समोर येतो
पण समोरचा त्यावेळी
पाहणारा असावा लागतो
पण दैव दुर्विलास असा
कि समोरचा आपल्या मुखवट्यांच्या
अदलाबदलीच्या खेळत अडकलेला असतो
कारण त्यालादेखील आपला खेळ चांगला रंगवायचा असतो
म्हणून तो खरा चेहरा पाहण्याची संधी मुकतो
आणि खरा चेहरा नेहमी पडद्याआडच राहतो

-जीवनिका

ती/तो

ती/तो

प्रत्येकाच्या मनातला ती किंवा तो
त्याला काही नाव नको देऊया
त्याला कोणता चेहरा नको लावूया
राहू दे त्याला तसाच
अनोळखी तरीही ओळखीचा वाटणारा
आहे कुठेतरी तो या जगात
राहू दे मला या भ्रमात
तो सापडण्याआधी, त्याला शोधण होऊ दे
मोहराण्याआधी, माझ झुरण होऊ दे
त्याची वाट पाहण, माझ जगण होऊ दे
त्याच्या दिसण्याआधी, त्याच असण होऊ दे
त्याच्या सत्याआधी, त्याच स्वप्न पाहू दे
कुणीतरी तो, त्याला तसाच राहू दे

-जीवनिका



Tuesday, November 1, 2011

भ्रम

नको ना तो भ्रम मोडूस

नको ना ते चित्र खोडूस

राहू दे ते तसच

पडून राहील वर्षानुवर्ष

काळासोबत जीर्ण होईल

आणि त्याच पर्ण होईल

जाळीदार होईल काही काळानंतर

आणि त्यासोबतच ते वाहून जाईल

पण खोडल जाणार नाही कधीच

तुही नकोच खोडूस ते आज

राहू दे तो भ्रम तसाच

-जीवनिका




का रे मना

का रे मना

असा वेड्यासारखा धावतोस

धडपडलास तर तुला

कोण सावरणार आहे

एकटाच धावतो

आहेस या वाटेवर

मग शेवट कसा

इथे ठरणार आहे

म्हणून जिंकलास जरी

आज तू तरीही

पहा कुठे कोण

हरणार आहे

-जीवनिका


Monday, October 31, 2011

उद्या मी नसले तर ...

उद्या मी नसले तर ...

अगदीच काही हुंदका दाटणार नाही गळ्यात

अगदीच काही पाणी साठणार नाही डोळ्यात

पण चालता चालता काही पावलं मात्र थबकतील

चार दोन आठवणी डोळ्यांपुढे तरळतील

खोलवर कुठेतरी हलेल काहीतरी खास

क्षणभरच इथेच का ती असा मात्र होईल भास

पण पुढच्याच क्षणी काही उसासे सुटतील

आठवणीही त्यातून मोकळ्या होतील

भावनांची धारही मग बोथट होईल

आणि आठवेल अशा वेळी काही बोलायचे असते

पण जाणाऱ्याला वाईट म्हणण्याचा प्रघात नाही आपल्याकडे

म्हणून जाता जाता 'चांगली होती' एवढेच फक्त म्हणून जातील

-जीवनिका

(आपण नेहमी काहीतरी अपघाताच्या बातम्या वाचतो. कुणीतरी गेल्याच्या बातम्या पाहतो, वाचतो. अशा वेळी नेहमी माझ्या मनात येत, आपण समजू शकतो कि गेलेल्या व्यक्तीच्या कुटुंबाला कसे वाटत असेल. त्याच्या जवळच्या व्यक्तींना कसे वाटत असेल. पण हे झाल जवळच्या माणसंच वर्तुळ. त्या वर्तुळाच्या परीघाबाहेरील व्यक्तींचे पण दोन प्रकार पडतात. एक म्हणजे ते जे त्या व्यक्तीला अजिबात ओळखत नाहीत. त्यांना त्या घटनेबद्दल काहीही वाटणार नाही. ते त्रयस्थाच्या नजरेने त्याकडे पाहतील.

आता उरलेला भाग. असे लोक जे जाणाऱ्या व्यक्तीला फार थोडे ओळखतात. जवळीक नाही पण तोंडओळख आहे. अशा लोकांची साधारण प्रतिक्रिया कशी असेल याबद्दल मला उत्सुकता होती. हि कविता साधारणपणे याच लोकांची प्रतिक्रिया मांडते आहे.)

दीपज्योती २०११

क्षण आणि आठवणी

क्षणांच्या आठवणी होतात आणि क्षण परके होतात
पण आठवणी कधीच परक्या होत नाहीत
क्षण जाताना आयुष्य घेऊन जातात
पण आठवणी जगताना नेहमी सोबत करतात
पण कधी कधी आठवणी सुद्धा त्रास देतात
जसे जुन्या जखमांचे व्रण नव्याने जखमा देतात
पण त्यावर फुंकर घालायला पुन्हा आठवणीच येतात
आठवणी आणि क्षण वेगळे नसतात
कारण क्षणांच्याच नंतर आठवणी होतात
म्हणूनच येणारा प्रत्येक क्षण असा सांभाळावा
कि त्या क्षणांच्या चांगल्या आठवणी होतील
आणि येणाऱ्या प्रत्येक क्षणाला नवा रंग देऊन जातील

http://deepjyoti2011.blogspot.com/2011/09/blog-post_8236.html

कागदी फुलंच ते ...

कागदी फुलंच ते ...

कागदी फुलंच ते, त्याला ना मधू ना गंध

म्हणून ...

फुलपाखरू इंद्रधनुषी रंग त्यावर कधीच नाही रचणार

रेशमी केसांवर ते कधीच नाही सजणार

देवाच्या पायी नतमस्तक होण्याचा मान त्याला कधीच नाही मिळणार

ते तसच पडून राहणार...

त्याच्या डोळ्यांदेखत खऱ्या फुलांचे निर्माल्य होणार

आणि त्याच्या मनात एक शल्य कायम सलणार

पण,

कागदी का असेना फुलंच ते

कोमेजल नाही तरी चुरगळणारच कधी ना कधी

कारण या नश्वर जगात सौंदर्य कुठवर शाश्वत होऊन टिकणार

http://deepjyoti2011.blogspot.com/2011/09/blog-post_8236.html

Friday, August 26, 2011

आयुष्य अगदी ....

मला वाटतं,
आयुष्य अगदी खासगी नोंदवहीसारखं असत.
जगात पहिल्यांदा डोळे उघडताना
वहीच पहिलं पान उघडतं
अगदी नवं कोर पान
त्यावर काळ्या शाईने अक्षर उमटतात
जशी मनःपटलावर ती कोरली जातात
वेळोवेळी नव्याने पानं उघडत जातात
तशी नवी नवी अक्षर त्यावर उमटत जातात
आयुष्य सरत असतं...
काही पानं दुमडली जातात, परत कधीही उघडण्यासाठी
तर काही पानांचे कोपरे दुमडले जातात, पुन्हा पुन्हा पाहण्यासाठी
काही पानांत मोरपीस दडलेली असतात
तर काहींत जाळीदार सुकी पानं लपलेली असतात
काहीना सुवाच्य अक्षराची देणगी असते
तर काहींत अस्वस्थ मनाची कहाणी असते
पण काही पानं कोरीच राहतात
मुक्या आसवांचे त्यावर डाग असतात
आयुष्य सरत जात...
आणि पाहता पाहता शेवटच पान देखील मिटत
मिटलेल्या त्या पहिल्या आणि शेवटच्या पानात
सार रहस्य दडलेलं असतं
आयुष्य सरताच ते त्यात बंद होत
पुन्हा कधीही न उघडण्यासाठी
प्रत्येक आयुष्याच्या नोंदवहीत काहीतरी दडलेलं असतं

- जीवनिका .

मैत्री म्हणजे

मैत्री म्हणजे

श्रावणात असलेला उन पावसाचा खेळ

आणि आकाशी वसलेला इंद्रधनुषी मेळ

दोन जिवांतील अनामिक ओढ

प्रसंगी तुरट पण तरीही अवीट गोड

डगमगत्या पावलांना जशी धीराची साथ

आणि कधीही घातलेली हक्काची साद

जसा मायेने भारावलेला घासभर भात

आणि हलकेच पाठीवर ठेवलेला हात

अशीच राहुदे मैत्री जन्मभर

जसा वणवणता प्रवास आणि विश्रांती क्षणभर