कधी कधी अनोळखीकडून ओळखीकडे होत असणारा प्रवास उलट दिशेने कधी सुरु होतो कळतही नाही.

Sunday, July 24, 2011

वाटत …

वाटत …

वाटत एकटक त्या

क्षितिजाकडे पाहाव

आणि मावळत्या सुर्याला

डोळेभरून न्याहाळाव


वाटत ऐकावा कधी

सागराचा गाज

आणि ऐकावा वाऱ्याचा

तो मंजुळ आवाज


वाटत अनोळखी रस्त्यावरून

एकटच चालत रहाव

आणि वाटेत आपणच आपल्याला

सापडतोय का पाहाव

माझ जग…

माझं जग…
जावं निघून कुठेतरी दूर
जिथे नसतील ओळखीचे चेहरे
असेल अनोळखीच सारे
नसेल ओळख माझ्या चेहऱ्याची
होईल निर्माण ओळख माझ्या कर्तुत्वाची
नसेल खोटा आधार कोणाच्या असण्याचा
नसेल भार त्या अपेक्षांचा
जिथे असतील फक्त माझीच स्वप्न माझेच विचार
नाही होणार उगीचच कोणी माझ्यावर उदार
नाही वाटणार गरज दुसऱ्या कोण्या व्यक्तीची
फिरेल माझे जग माझ्याच भोवती
नसेल चेहऱ्यावर खोटा मुखवटा हास्याचा
नसेल अट्टाहास डोळ्यातलं पाणी लपवण्याचा
नाही खेळणार कोणी माझ्या स्वप्नांशी
नाही होणार पायमल्ली माझ्या भावनांची
जिथे पक्षी होऊन उडेन मी
स्वतःला शोधत फिरेन मी
असं असेल माझं जग
जिथे फक्त माझीच असेन मी

-जीवनिका (प्रांजल कोष्टी)

वाटत असाव कोणीतरी

वाटत असाव कोणीतरी

वाटत असाव कोणीतरी

मला आठवणार

आणि आठवणींच्या कप्प्यात

मला साठवणार


जीवनाच्या वाटेवर मागे वळून पाहताना

मला शोधणार

आणि माझ्या सोबत जगलेले चार क्षण

पुन्हा जगायला मागणार


माझ्या अस्तित्वाच्या खुणा

हळवेपणान न्याहाळणार

आणि न्याहाळता न्याहाळता

अजूनच हळव होणार


असाव कोणीतरी

भूतकाळात हरवणार

आणि हरवलेल्या मला आठवताना

डोळ्यात पाणी आणणार


असाव कुणीतरी जगात पुन्हा

माझ अस्तित्व शोधणार

आणि नाही सापडलं म्हणून

कासावीस होणार


नाही म्हणत असाव कोणीतरी

माझ्यासाठी जगणार

पण वाटत असाव कोणीतरी

जगताना दोन क्षण मला आठवणार

सोबती

सोबती

जीवनाच्या वाटेवर पाऊले आपली पडत जातात

आपण पुढे जातो मागे पाऊलखुणा राहतात

प्रत्येक टप्प्यावर मागे वळून पाहताना

अनेक माणस दिसतात

त्यातली काही आपली असतात

तर काही कुणीही नसतात

पण काही कुणीही नसूनही आपली असतात

भूतकाळातल्या भाऊगर्दीत ती उठून दिसतात

त्यांच्या वाटा कुठेतरी आपल्यापासून वेगळ्या झालेल्या असतात

पण तरीही चार पावल आपण समांतर टाकलेली असतात

ती पावल आपल्यासोबत पडतात

थोडाकाळ सोबत करतात आणि वेगळी होतात

पण तरीही मनात कोरली जातात

आयुष्यात असेही काही सोबती असतात

आपल्याही नकळत ते आपल्याला घडवत जातात

आस

आस

मिटता चुकून डोळे, तुझीच आकृती स्मरते

मग त्या क्षणांपुरती, माझीच मी न उरते

विसरून या जगाला, स्वप्नात त्या मी झुलते

दुःखास वाट देवून, सुख अंतरित येते

आहे जाणीव मलाही,क्षणभंगुर त्या सुखाची

तरीही खुळ्या मनाला, का तुझीच आस छळते

मृगजळ

मृगजळ

सांग रे वेड्या मना

का सत्याचा तुज भार होतो

अन् जखडून टाकणाऱ्या

स्वप्नांचा तुज आधार होतो


का क्षणभराच्या सुखासाठी

सत्याकडे फिरावतोस पाठ

आणि साधतो रात्रंदिन

त्या वेड्या मृगजळाशी संवाद

आयुष्य

आयुष्य

आयुष्य म्हणजे काय

तर एक दिवा

त्याने जळत राहव

जळत राहव

सर्वांच आयुष्य उजळवत रहाव

हीच सर्वांची अपेक्षा

पण त्याच्यातल्या अंधाराच काय?

त्याला उजेड कोण देणार?

किती दिवस

किती दिवस

किती दिवस त्याच

जुन्या गोष्टी घेऊन बसायचं

आपणच आपलं जगणं

नव्याने सुरु करायचं

जुन्या मळक्या भिंतीना

नव्याने रंग द्यायचा

वेड्या वाकड्या धुंद गाण्यात

सूर गवसला म्हणायचा

फुलपाखराच्या नाजूक पंखात

रंग नवा शोधायचा

मोगर्‍याचा धुंद सुगंध

जीवनी उतरवायचा

काहीतरी हरवल्यासारख वाटत

काहीतरी हरवल्यासारख वाटत

कुठेतरी काहीतरी हरवल्यासारख वाटत

मन कासावीस होत

कशाच्या तरी मागे धावत

अडखळत धडपडत

थकत आणि थांबत


कधी कधी वाटत

हरवलेलं सापडलं

त्य गोष्टीला मन आंजारत गोंजारत

पण नंतर काळात

जे हव होत ते हे नव्हतच


पुन्हा मन धावत पळत

सापडलं असा वाटत

अगदी हात लांबवून जवळ घ्याव

इतक ते जवळ आहे अस वाटत

पण इतक्यात ते पुन्हा दूर निघून जात


मृगजळाच्या मागे धावतोय हे कळत

पण तरीही काहीतरी हरवल्यासारख वाटत

मग केव्हातरी हळूच मन मागे वळत

अन् आयुष्यच हरवल्याच नकळतच कळत

अशीच मी

अशीच मी

अशीच मी अशीच मी

न जाणवे कुणाला ,न ओळखते कुणी मला

अफाट या जगात मी ,शोधते सत्याला

न सापडे ते सत्य मला ,न तोड त्या असत्याला

पण वाटतो विश्वास हा ,सापडेल सत्य मला

न संपणाऱ्या अंधारात ,सापडेल दिवा मला

किती आले किती गेले ,वाटेत या शोधत त्याला

पण न आला कधी ,सूर्य सत्याचा उदयाला

अशा न मावळो माझी कधी

मानव हा आशावादी प्राणी

अशीच मी अशीच मी

चालते सत्याची कास धरुनी