कधी कधी अनोळखीकडून ओळखीकडे होत असणारा प्रवास उलट दिशेने कधी सुरु होतो कळतही नाही.

Friday, August 26, 2011

आयुष्य अगदी ....

मला वाटतं,
आयुष्य अगदी खासगी नोंदवहीसारखं असत.
जगात पहिल्यांदा डोळे उघडताना
वहीच पहिलं पान उघडतं
अगदी नवं कोर पान
त्यावर काळ्या शाईने अक्षर उमटतात
जशी मनःपटलावर ती कोरली जातात
वेळोवेळी नव्याने पानं उघडत जातात
तशी नवी नवी अक्षर त्यावर उमटत जातात
आयुष्य सरत असतं...
काही पानं दुमडली जातात, परत कधीही उघडण्यासाठी
तर काही पानांचे कोपरे दुमडले जातात, पुन्हा पुन्हा पाहण्यासाठी
काही पानांत मोरपीस दडलेली असतात
तर काहींत जाळीदार सुकी पानं लपलेली असतात
काहीना सुवाच्य अक्षराची देणगी असते
तर काहींत अस्वस्थ मनाची कहाणी असते
पण काही पानं कोरीच राहतात
मुक्या आसवांचे त्यावर डाग असतात
आयुष्य सरत जात...
आणि पाहता पाहता शेवटच पान देखील मिटत
मिटलेल्या त्या पहिल्या आणि शेवटच्या पानात
सार रहस्य दडलेलं असतं
आयुष्य सरताच ते त्यात बंद होत
पुन्हा कधीही न उघडण्यासाठी
प्रत्येक आयुष्याच्या नोंदवहीत काहीतरी दडलेलं असतं

- जीवनिका .

मैत्री म्हणजे

मैत्री म्हणजे

श्रावणात असलेला उन पावसाचा खेळ

आणि आकाशी वसलेला इंद्रधनुषी मेळ

दोन जिवांतील अनामिक ओढ

प्रसंगी तुरट पण तरीही अवीट गोड

डगमगत्या पावलांना जशी धीराची साथ

आणि कधीही घातलेली हक्काची साद

जसा मायेने भारावलेला घासभर भात

आणि हलकेच पाठीवर ठेवलेला हात

अशीच राहुदे मैत्री जन्मभर

जसा वणवणता प्रवास आणि विश्रांती क्षणभर

Saturday, August 13, 2011

खरच का नियती इतकी निष्टुर असते ?

खरच का नियती इतकी निष्टुर असते ?

येणाऱ्या प्रत्येक जीवाला

हातच्या खेळण्या सारख खेळवते

सर्व दोर हाती धरून

कठपुतली सारख नाचवते

खरच का नियती इतकी निष्टुर असते ?


चेहऱ्यावरच हसू

किती कठोरतेने पुसते

डोळ्यातलं पाणी पाहून

निर्दयतेने हसते

खरच का नियती इतकी निष्टुर असते ?


गेल्याजन्मीच्या पाप पुण्याचे हिशेब

या जन्मी मांडते

आणि खरोखरीच निष्पाप जीवांवर

जीवघेणे आघात करते

खरच का नियती इतकी निष्टुर असते ?


दोन क्षणात

होत्याच नव्हत करते

पाहता पाहता

उभ्या जीवनच मातेर करते

खरच का नियती इतकी निष्टुर असते ?


पण हळूच कधी कधी

ओंजळी भर भरून सुख देते

दुखालेल्या जीवाला

मायेची उब देते

खरच ही नियती इतकी का निष्टुर असते ?