कधी कधी अनोळखीकडून ओळखीकडे होत असणारा प्रवास उलट दिशेने कधी सुरु होतो कळतही नाही.

Monday, October 31, 2011

उद्या मी नसले तर ...

उद्या मी नसले तर ...

अगदीच काही हुंदका दाटणार नाही गळ्यात

अगदीच काही पाणी साठणार नाही डोळ्यात

पण चालता चालता काही पावलं मात्र थबकतील

चार दोन आठवणी डोळ्यांपुढे तरळतील

खोलवर कुठेतरी हलेल काहीतरी खास

क्षणभरच इथेच का ती असा मात्र होईल भास

पण पुढच्याच क्षणी काही उसासे सुटतील

आठवणीही त्यातून मोकळ्या होतील

भावनांची धारही मग बोथट होईल

आणि आठवेल अशा वेळी काही बोलायचे असते

पण जाणाऱ्याला वाईट म्हणण्याचा प्रघात नाही आपल्याकडे

म्हणून जाता जाता 'चांगली होती' एवढेच फक्त म्हणून जातील

-जीवनिका

(आपण नेहमी काहीतरी अपघाताच्या बातम्या वाचतो. कुणीतरी गेल्याच्या बातम्या पाहतो, वाचतो. अशा वेळी नेहमी माझ्या मनात येत, आपण समजू शकतो कि गेलेल्या व्यक्तीच्या कुटुंबाला कसे वाटत असेल. त्याच्या जवळच्या व्यक्तींना कसे वाटत असेल. पण हे झाल जवळच्या माणसंच वर्तुळ. त्या वर्तुळाच्या परीघाबाहेरील व्यक्तींचे पण दोन प्रकार पडतात. एक म्हणजे ते जे त्या व्यक्तीला अजिबात ओळखत नाहीत. त्यांना त्या घटनेबद्दल काहीही वाटणार नाही. ते त्रयस्थाच्या नजरेने त्याकडे पाहतील.

आता उरलेला भाग. असे लोक जे जाणाऱ्या व्यक्तीला फार थोडे ओळखतात. जवळीक नाही पण तोंडओळख आहे. अशा लोकांची साधारण प्रतिक्रिया कशी असेल याबद्दल मला उत्सुकता होती. हि कविता साधारणपणे याच लोकांची प्रतिक्रिया मांडते आहे.)

दीपज्योती २०११

क्षण आणि आठवणी

क्षणांच्या आठवणी होतात आणि क्षण परके होतात
पण आठवणी कधीच परक्या होत नाहीत
क्षण जाताना आयुष्य घेऊन जातात
पण आठवणी जगताना नेहमी सोबत करतात
पण कधी कधी आठवणी सुद्धा त्रास देतात
जसे जुन्या जखमांचे व्रण नव्याने जखमा देतात
पण त्यावर फुंकर घालायला पुन्हा आठवणीच येतात
आठवणी आणि क्षण वेगळे नसतात
कारण क्षणांच्याच नंतर आठवणी होतात
म्हणूनच येणारा प्रत्येक क्षण असा सांभाळावा
कि त्या क्षणांच्या चांगल्या आठवणी होतील
आणि येणाऱ्या प्रत्येक क्षणाला नवा रंग देऊन जातील

http://deepjyoti2011.blogspot.com/2011/09/blog-post_8236.html

कागदी फुलंच ते ...

कागदी फुलंच ते ...

कागदी फुलंच ते, त्याला ना मधू ना गंध

म्हणून ...

फुलपाखरू इंद्रधनुषी रंग त्यावर कधीच नाही रचणार

रेशमी केसांवर ते कधीच नाही सजणार

देवाच्या पायी नतमस्तक होण्याचा मान त्याला कधीच नाही मिळणार

ते तसच पडून राहणार...

त्याच्या डोळ्यांदेखत खऱ्या फुलांचे निर्माल्य होणार

आणि त्याच्या मनात एक शल्य कायम सलणार

पण,

कागदी का असेना फुलंच ते

कोमेजल नाही तरी चुरगळणारच कधी ना कधी

कारण या नश्वर जगात सौंदर्य कुठवर शाश्वत होऊन टिकणार

http://deepjyoti2011.blogspot.com/2011/09/blog-post_8236.html