कधी कधी अनोळखीकडून ओळखीकडे होत असणारा प्रवास उलट दिशेने कधी सुरु होतो कळतही नाही.

Monday, November 21, 2011

डाव

मुखवटा कुणीच ओढला नव्हता
पडदा तुझ्याच डोळ्यांवर होता
साद कुणीच घातली नव्हती
आवाज तुझ्याच मनाचा होता
वाट कुणीच दाखवली नव्हती
पाठलाग तूच केला होतास
डाव कुणीच मांडला नव्हता
मांडलेला डाव फक्त तुझाच होता
म्हणून
मोडला जरी डाव तरी
दोष कुणाला देऊ नकोस
पण पुन्हा नवा डाव मांडण्याची
तसदी मात्र घेऊ नकोस
पण सवयीचा गुलाम तू
मांडणारच डाव नवा
तेव्हा एक मात्र कर
नवा सवंगडी मात्र मागू नकोस

-जीवनिका

Sunday, November 6, 2011

तळ्यातल पाणी

तळ्यातल पाणी
त्याला झऱ्यासारख वाहण कुठे माहितीये?
सारख आकाशाकडे डोळे लावून बसत
त्याला जगाकडे पाहण कुठे माहितीये?

कधीतरी पाऊस येणार
थोड वाहायला शिकवून जाणार
याची ते वाट पाहत राहत
पण वाहायचंय वाहायचंय म्हणताना
त्याच वाहायच राहूनच जात
वाट पाहता पाहता आटण मात्र होत

मग नेमेची पावसाळा येतो
थोड वाहण देऊन जातो
पुन्हा तो गेल्यावर त्याच वाहण थांबत
पुन्हा डोळे लावून वाट पाहण होत
कारण वाहण म्हणजे नक्की काय
हे त्याला माहीतच कुठे असत?

काहींच जगण सुद्धा असंच असत
कुणीतरी येणार
जगण शिकवून जाणार
कुणीतरी येतही
जगण देऊन जातही
गेल्यावर पुन्हा वाट पाहणंही होत

पण खर जगण कसं होणार
कारण जगण म्हणजे काय
हे त्यांना माहित कुठे असत?

-जीवनिका

Friday, November 4, 2011

मला माझ्या अज्ञानातच थोड जगायचय

मला माझ्या अज्ञानातच थोड जगायचय

सापडलेला हीरा कि नुसता चकाकणारा दगड

ते नाही मला पाहायचंय

त्याच्या त्या चकाकण्याने

मला दिपून जायचंय

सत्य आणि भ्रम यातलं

अंतर पुसून टाकायचंय

मला माझ्या अज्ञानातच थोड जगायचय

थोड रेंगाळत चालत जायचंय

माझीच पावल मोजत जायचंय

त्यातसुद्धा मला थोड चुकायचंय

मला माझ्या अज्ञानातच थोड जगायचय

-जीवनिका

Thursday, November 3, 2011

चेहरा

जगात प्रत्येक जण रंग भूमीवरच पात्र रंगवत असतो
पण त्या पलीकडला खरा माणूस कुठे दिसतो?
तो चेहरा नेहमी लपलेला असतो
जो समाजाच्या चौकटींत बसतो
तोच मुखवटा प्रत्येकजण ओढतो
कालांतराने मुखवटा बदलतो
पण खरा चेहरा लपूनच राहतो
पण कधीतरी एखादा क्षण येतो
आणि चेहरा उघडा पडतो
दोन मुखवट्यांच्या अदलाबदलीच्या
दरम्यान घात होतो
काही काळापुरताच का होईना
खरा चेहरा समोर येतो
पण समोरचा त्यावेळी
पाहणारा असावा लागतो
पण दैव दुर्विलास असा
कि समोरचा आपल्या मुखवट्यांच्या
अदलाबदलीच्या खेळत अडकलेला असतो
कारण त्यालादेखील आपला खेळ चांगला रंगवायचा असतो
म्हणून तो खरा चेहरा पाहण्याची संधी मुकतो
आणि खरा चेहरा नेहमी पडद्याआडच राहतो

-जीवनिका

ती/तो

ती/तो

प्रत्येकाच्या मनातला ती किंवा तो
त्याला काही नाव नको देऊया
त्याला कोणता चेहरा नको लावूया
राहू दे त्याला तसाच
अनोळखी तरीही ओळखीचा वाटणारा
आहे कुठेतरी तो या जगात
राहू दे मला या भ्रमात
तो सापडण्याआधी, त्याला शोधण होऊ दे
मोहराण्याआधी, माझ झुरण होऊ दे
त्याची वाट पाहण, माझ जगण होऊ दे
त्याच्या दिसण्याआधी, त्याच असण होऊ दे
त्याच्या सत्याआधी, त्याच स्वप्न पाहू दे
कुणीतरी तो, त्याला तसाच राहू दे

-जीवनिका



Tuesday, November 1, 2011

भ्रम

नको ना तो भ्रम मोडूस

नको ना ते चित्र खोडूस

राहू दे ते तसच

पडून राहील वर्षानुवर्ष

काळासोबत जीर्ण होईल

आणि त्याच पर्ण होईल

जाळीदार होईल काही काळानंतर

आणि त्यासोबतच ते वाहून जाईल

पण खोडल जाणार नाही कधीच

तुही नकोच खोडूस ते आज

राहू दे तो भ्रम तसाच

-जीवनिका




का रे मना

का रे मना

असा वेड्यासारखा धावतोस

धडपडलास तर तुला

कोण सावरणार आहे

एकटाच धावतो

आहेस या वाटेवर

मग शेवट कसा

इथे ठरणार आहे

म्हणून जिंकलास जरी

आज तू तरीही

पहा कुठे कोण

हरणार आहे

-जीवनिका