कधी कधी अनोळखीकडून ओळखीकडे होत असणारा प्रवास उलट दिशेने कधी सुरु होतो कळतही नाही.

Thursday, February 23, 2012

लाटा आणि भावना
यात काय फरक आहे
सागरात जशा लाटा
एकापाठोपाठ एक येताच असतात
तशा मनाच्या सागरात
भावना येत जातात
कधी हलक्या कधी मोठ्या
एका लाटे पासून दुसरी लाट
वेगळी करता येणार नाही
तसच एका भावनेपासून दुसरी भावना
वेगळी करता येण शक्य नाही
आयुष्याचा मार्ग हा असा एकच मार्ग आहे
ज्यावर चालत असताना माणसाला शेवट नको असतो.
हा मार्ग कधी संपूच नये अस वाटत.
या मार्गावर चालताना माणूस थकत नाही.
या शर्यतीत कधी कोणाला जिंकावस वाटत नाही.

Tuesday, February 21, 2012

मला अज्ञानीच राहू दे
अर्थ नको सांगूस लावायला
अर्थ न लावता
शिकायचय मला जगायला
बेधुंद होऊन चालायला
ठेचकाळले तरी पुन्हा उठायला
आणि वेड्यासारख पुन्हा
त्याच मार्गावरून चालायला
कुणी वेड म्हटलं तरी
त्यावर वेड्यासारख हसायला
पण नको सांगूस मला
त्या वेडेपणामागचा अर्थ मात्र शोधायला

मागे वळून मी पाहणारच आहे .......

पुढे जायचेच आहे
जाणारच आहे
पण तरीही मागे जाऊन
थोडावेळ थांबावे वाटणारच आहे

हरवलेल्या क्षणांची वाळू
हातात घेणारच आहे
भरलेली ओंजळ पुन्हा
रिती होणारच आहे

त्या वाळूचा किल्ला
बांधला जरी तरी
पुन्हा एकदा तो
मोडून पडणारच आहे

येणारी लाट सोबत
तुला नेणारच आहे
तरीही पुन्हा इथेच असशील
असे मला वाटणारच आहे

पाठमोराच तू
राहणार जरी नेहमी
तरीही मागे वळून मी
पाहणारच आहे

-जीवनिका

Monday, February 6, 2012

मना सांग रे ...

मना सांग रे
तुला मी कसे ओळखावे

कधी वाटतो तू वसंतापरी अन्
कधी हा असा सावळा रंगलेला

कधी होतसे मंद झुळूकेपरी तू
कधी का असे तू दिशाहीन वारा

कधी घेतसे झेप प्रकाशाकडे अन्
कधी का असे अंधार तुला भावलेला

मना सांग रे
नेहमी हे असेच का व्हावे
तुझ्यासवे नेहमीच का मी झुलावे
आधी फुलावे अन् मग कोमेजून जावे
मना सांग रे

-जीवनिका

Wednesday, February 1, 2012

स्वप्नांच गाव

का जुन्या स्वप्नांचा हात सोडून
आपण पुढे निघून जातो
आपण पुढे जातो
स्वप्नांचा गाव मागे राहतो
मग कधीतरी आपणच सजवलेल्या
त्य गावात आपण पुन्हा पाय ठेवतो
पण आपलाच तो गाव
आपल्याला परका वाटू लागतो
आपणच सजवलेला तो एक एक खेळ
मग लहानग्यांच्या भातुकलीच्या खेळा इतका
खुळा वाटू लागतो
पण तरीही क्षणभर का होईना
तो खेळ पुन्हा जगवा वाटतो
पण काही केल्या त्या जुन्या खेळात
आता गुंतता येत नाही
पुन्हा जुन्या स्वप्नांत आता हरवता येत नाही
मग वाटत
हीच का ती स्वप्न ज्यात आपण हरवलो होतो
त्याच का त्या स्वप्नासोबत
आपण क्षण अन क्षण जगलो होतो
विश्वास ठेवण तस जरा कठीणच होत
पण याही प्रश्नच उत्तर आपल्याकडेच असत
जुन्या त्या स्वप्नांची जागा
आपल्याच नव्या स्वप्नांनी घेतलेली असते
आणि आपणच नकळत आपल्या
जुन्या सोबत्यांची सोबत सोडलेली असते
म्हणूनच
आपल्याच जुन्या स्वप्नांचा गाव
आपल्यासाठी परका असतो
आणि आपल्याच त्या गावात
आपला मार्ग हरवलेला असतो

-जीवनिका