कधी कधी अनोळखीकडून ओळखीकडे होत असणारा प्रवास उलट दिशेने कधी सुरु होतो कळतही नाही.

Saturday, November 1, 2014

न लिहिलेलं पत्र, एका न उलगडलेल्या नात्याला

प्रिय नात्यास , 

अशा एका नात्यास, जे अगदी नकळत जुळलं. इतर कोणत्याही नात्यांपेक्षा ज्याची वीण घट्ट आहे अस एक नातं. ज्या नात्याने मला नकळत खूप काही दिलं. त्या नात्यासाठी हे पत्र. 

 खूप सारी नाती आपल्याभोवती 'पडलेली' असतात. जन्मापासून आपल्यासोबत बांधलेली असतात. पण हक्काने हाक मारावी अस एकाही नातं त्यात नसावं यासारखं दुःख नाही. पण तुझ्याशी असलेल हे नातं वेगळ आहे. लहानपणापासुनच सवयीने मी कधी कोणाला साधी हाक सुद्धा मारली नाही  पण तु भेटल्यानंतर का कुणास ठाऊक तुला हक्काने थांबवून घेत राहिले, तुझ्याशी गप्पा मारत आले. तुझ्याशी बोलताना हलकं वाटायचं, डोक्यातला गुंता मोकळा झाल्यासारखा वाटायचा. का असं वाटलं कुणास ठाऊक पण तुझ्याशी बोलताना उगाच लहान झाल्यासारख वाटायचं. नेहमी वाटलं, मी कितीही वेडेपणाने वागले तरी तु समजून घेशील. मोठेपणाच,समजूतदारपणाच अवेळी आलेल ओझ अगदी नकळत उतरत गेलं. तु मला हसायला शिकवलसं. हा अमूल्य ठेवा आयुष्यभर असाच राहील माझ्याजवळ . 

काही देऊ शकत नाही मी तुला, तुझ्यापेक्षा लहान आहे. पण देवाजवळ तुझा आनंद नक्की मागत राहीन एवढ मात्र खरं .

Friday, October 31, 2014

काही गोष्टी बघायला मनाचे स्वतःचे डोळे असतात स्वतःचे कान असतात.

Monday, October 27, 2014

काही धागे तटकन तुटत नाही. एक एक पीळ उसवत तुटत-तुटत जातात.

Wednesday, September 24, 2014

सुखाकडे नेणारी पाउलवाट एखाद्याची अशी मुठीत दाबून धरू नये
श्वासांचाही आत येण्याचा मार्ग अडत जातो

Wednesday, September 10, 2014

आयुष्य बनून समोर उभा राहू नकोस असा
जगण्यावरचा विश्वास नको इतका वाढत जातो

मेलेल्याला जगण्याची अशा दाखवू नये कधी
तिरडीवरचा देह वेळेआधीच सडत जातो

Tuesday, September 9, 2014

'सुरुवाती'कडून 'शेवटा'कडे नेल्यासारखं भासवून पुन्हा सुरुवातीलाच आणून ठेवणाऱ्या एका मोठ्या शून्यासारखं असणारं आयुष्य आणि त्या शून्याला सजवण्याची माणसाची केवढी ती धडपड... उगाच...

Friday, August 29, 2014


किती सोप्पय ना रे तुमच्यासारख्यांच जगणं. हवं तेव्हा हवं ते करायचं, हवं तसं जगायचं. जसं पक्ष्यांना हवं तेव्हा हवं तितक्या वेळ आकाशात उडता येतं. तुमच्यासारख्यांच आकाश या क्षितिजापासून त्या क्षितिजापर्यंत पसरलेलं, अफाट, अमर्याद. आमच तसं नसत रे. आमच्या आकाशाला खूप मर्यादा पडतात. आमच आकाश छोटस, खिडकीतून दिसणाऱ्या छोट्याशा तुकड्या एवढं. तेव्हढ्याच आकाशात उडायचं चिटपाखरू होऊन, तेही जमलं तर, नाही तर तुमच्यासारख्यांना पाहायचं उडताना

आणि सगळ्यात वाईट म्हणजे आमच्या आकाशाच्या मर्यादा आमच्या आम्हीच ठरवलेल्या असतात.

Thursday, August 21, 2014

न बोलता येणारं दुःख म्हणजे मनाला लागलेली वाळवी ...

Saturday, August 2, 2014

गुंता

काही नाती विणता विणता अगदी नकळत गुंता होतो, तो गुंता सोडवता सोडवता आपणही त्यात गुंतत जातो, इतके कि त्याचा गळ्याभोवती फास बसायला लागतो.

बर धागाच कापावा म्हटलं त्या धाग्यातच खरा जीव गुंतलेला...

म्हणजे कस ना धागा न कापता गुंता तसाच राहू द्यावा तरी गळफास बसून जीव जाणार आणि धागा कापावा तरी त्यातही जीव गुंतलेला म्हणून जीव जाणार, म्हणजे जीव जाणारच फक्त तो कसा जाणार एवढच ठरवण आपल्या हातात असतं.

Monday, July 28, 2014

ओरखडा


नुसत्या विसर म्हटल्याने विसरता येतात काही गोष्टी?

आयुष्याच्या काळ्या पाटीवर पांढर्या खडूने बरच काही लिहील जातं. कधी कधी पाटी पुसायची वेळ येते तेव्हा लिहिलेलं पुसताही येत, अगदीच नाही जमल तर ओल्या कापडाने पुसायच. 

पण काही गोष्टी पाटीवर अगदी ओरखड्यासारख्या उमटून गेल्या असतील तर? तो ‘ओरखडा’ कसा पुसायचा? 

पाटी काळी होते पुन्हा पण नवी कोरी होत नाही
आयुष्याची गोष्ट आता तुझ्याशिवाय पुरी होत नाही

Wednesday, July 9, 2014

आले मी पुन्हा, या समुद्रकिनारी
जरा गप्पा मारुयात, नेहमीसारख्या
पण  गप्पा कसल्या त्या
मीच बोलत असते सारखी
आणि तु मात्र गप्प
त्या सागराच्या साक्षीने
निवांत पणे ऐकत राहतोस सारं काही
आणि मी
होत राहते रिती
कुठेही, अगदी कुठेही वाहणारी नदी
जशी या समुद्राकडे विसावा शोधते ना
तसं, अगदी तसं
माझी सगळी सुख, दुख,
स्वप्न, अपेक्षा
सगळ्या तुझ्याचकडे विसावा शोधतात
मन कसं अगदी हलक हलक होतं.
मग,
चल, निघते मी असं म्हणून जरी मी दूर जात राहिले तरी
जशी सागराच्या ओढीने नदी वाहत येतेच,
तशी मीही परत फिरून इथेच येणार आहे
माझ्या या हक्काच्या विसाव्याकडे
हे तुला माहित असतच.
पण  एक प्रश्न मात्र नेहमीच मला सतावतो
कायमच हाकेच्या अंतरावर असणारा तु
नजरेच्या टप्प्यात मात्र कधीच का नसतोस ?
कधीच का नसत तुला नाव, चेहरा ?
असतं फक्त एक अस्तित्व
पुसटस, धुसर, तरीही जाणवणारं
असो,
नदीला तरी कुठे पुरी ओळख असते समुद्राची
तरीही ती धावतेच ना त्याच्या ओढीने
मीही येणारच आहे अशीच नेहमीच
या माझ्या स्वप्नातल्या
हक्काच्या विसाव्यापाशी
आणि
कधी न कधी दिसेलच मला तुझा चेहरा
स्पष्ट

प्रत्येक  माणसाला हवा असतो असा एक सोबती,
एक विसावा मनातलं सांगण्यासाठी, मोकळ होण्यासाठी
बऱ्याचदा हा चेहरा अस्पष्ट असतो, अंधुक असतो.
कधी त्याला आपल्याच जिवलग माणसाचा चेहरा असतो
तर कधी नीट निरखून पाहिलं तर आपलाच चेहरा त्यात दिसतो,
आणि असा माणूस जगात सर्वात एकटा असतो.





Wednesday, April 30, 2014

का रे मना असा वेड्यासारखा धावतोस
धडपडलास तर तुला कोण सावरणार आहे
एकटाच धावतो आहेस या वाटेवर
मग शेवट कसा इथे ठरणार आहे
म्हणून जिंकलास जरी तू आज तरीही
पहा कुठे कोण हरणार आहे
सांग रे वेड्या मना का सत्याचा तुज भर होतो
अन जखडून टाकणाऱ्या स्वप्नांचा तुज आधार होतो