अगदीच काही हुंदका दाटणार नाही गळ्यात
अगदीच काही पाणी साठणार नाही डोळ्यात
पण चालता चालता काही पावलं मात्र थबकतील
चार दोन आठवणी डोळ्यांपुढे तरळतील
खोलवर कुठेतरी हलेल काहीतरी खास
क्षणभरच इथेच का ती असा मात्र होईल भास
पण पुढच्याच क्षणी काही उसासे सुटतील
आठवणीही त्यातून मोकळ्या होतील
भावनांची धारही मग बोथट होईल
आणि आठवेल अशा वेळी काही बोलायचे असते
पण जाणाऱ्याला वाईट म्हणण्याचा प्रघात नाही आपल्याकडे
म्हणून जाता जाता 'चांगली होती' एवढेच फक्त म्हणून जातील
-जीवनिका
(आपण नेहमी काहीतरी अपघाताच्या बातम्या वाचतो. कुणीतरी गेल्याच्या बातम्या पाहतो, वाचतो. अशा वेळी नेहमी माझ्या मनात येत, आपण समजू शकतो कि गेलेल्या व्यक्तीच्या कुटुंबाला कसे वाटत असेल. त्याच्या जवळच्या व्यक्तींना कसे वाटत असेल. पण हे झाल जवळच्या माणसंच वर्तुळ. त्या वर्तुळाच्या परीघाबाहेरील व्यक्तींचे पण दोन प्रकार पडतात. एक म्हणजे ते जे त्या व्यक्तीला अजिबात ओळखत नाहीत. त्यांना त्या घटनेबद्दल काहीही वाटणार नाही. ते त्रयस्थाच्या नजरेने त्याकडे पाहतील.
आता उरलेला भाग. असे लोक जे जाणाऱ्या व्यक्तीला फार थोडे ओळखतात. जवळीक नाही पण तोंडओळख आहे. अशा लोकांची साधारण प्रतिक्रिया कशी असेल याबद्दल मला उत्सुकता होती. हि कविता साधारणपणे याच लोकांची प्रतिक्रिया मांडते आहे.)
दीपज्योती २०११