कधी कधी अनोळखीकडून ओळखीकडे होत असणारा प्रवास उलट दिशेने कधी सुरु होतो कळतही नाही.

Wednesday, October 10, 2012

जगासाठी वार्यावरती, भिरभिरणारं पान जरी
माझ्यासाठी मात्र बेधुंद, जगणं त्याच छान होतं

-जीवा
काही ढगांना गरजत बरसणं ही जमतं
काहींना मात्र साधी रिपरिपही जमत नाही
-Jiva

Saturday, September 22, 2012

बांडगुळ

नकोय मला आधार
आधार मिळाला ना की बांडगुळ व्हायला होतं
आधाराला जखडून जायला होतं
प्रत्येक नवी पालवी फुटण्याआधी
आधाराकडे आशेने पहावं लागतं
नाही व्हायचय मला बांडगुळ
आणि तुझाही आधार वृक्ष होऊ द्यायचा नाहीये
नाही तर आधार देता देता
आधार वृक्षच कोलमडून पडायचा
मग त्यावर जगणारं बांडगुळ तरी
कसं उभं राहणार
म्हणून
नाही व्हायचय मला बांडगुळ
आणि तुझाही आधार वृक्ष होऊ द्यायचा नाहीये
तुला बहरताना पहायचय
आणि माझा आधार मात्र मलाच व्हायचय

-जीवा


Sunday, September 9, 2012

व्यर्थच

जगण्याचा अर्थ शोधता, मरणाचे ते भय ठरले
मरणाचा अर्थ उमगता, जगणे ते व्यर्थच ठरले

नसण्यासम असणे होते, क्षणभर ते जगणे होते
जगण्याचा अर्थ हरवता, असणे ते व्यर्थच ठरले

काळासव घडले काही, जगण्यातून कळले काही
पण सारे अर्थ हरवले, कळणे ते व्यर्थच ठरले

- जीवा

गझल  लिहिण्याचा प्रयत्न केला होता पण जमला नाही.

Tuesday, July 24, 2012

चल थोडे थोडे भांडून घेऊ
चल थोडे थोडे रुसून घेऊ
या थोडया भांडण्यात
या थोडया रुसण्यात
चल थोडे थोडे हसून घेऊ
चल थोडा थोडा अबोला करू
चल थोडा थोडा फुगवा धरू
या थोडया अबोल्यात
या थोडया फुगण्यात
चल  थोडे थोडे बोलून घेऊ
या भांडण्याची दगदग फार
या रुसण्या फुगण्याचे श्रम फार
या श्रमण्या दमण्याच्या दगदगीतून
विश्रांतीचा एक क्षण चोरून घेऊ
चल, जाऊया कुठेतरी
एका शांत निवांत जागी थोडे बसून घेऊ
थोडे  हसून घेऊ
थोडे बोलून घेऊ
तुझ्या माझ्या असणाऱ्या या क्षणात
थोडे थोडे जगून घेऊ
पुन्हा सुरु होईलच पाठशिवणीचा खेळ
थोडा अबोला रुसवा फुगवा साऱ्याचीच भेळ
आपण पुढेच चालत राहू
जगणे कुठेतरी मागेच सुटेल
म्हणून  थांब...
मला  एक वचन दे
तू येशील इथेच असाच एक क्षण चोरून
आपण असेच भेटत राहू
थोडे हसत राहू
थोडे बोलत राहू
तुझ्या माझ्या क्षणांमध्ये
थोडे थोडे जगत राहू

- जीवा

तू मला तुझ आकाश दे
मी तुला माझ आकाश देईन
तू  माझा तारा हो
मी  तुझा तारा होईन
तू मला दिशा दाखव
मी तुझा मार्ग पाहीन
तुझ्या  आकाशात मी
माझे धृवपद मिरवीन
आपल्या  या जगात आपण
आपलेआपलेच राहू
आपल्या आपल्या नभात
आपण आपलेच तारे पाहू
आपण आपले आपलेच राहू

-जीवा

Friday, July 20, 2012

तुझ्याकरता जरी एका, क्षणापुरत असण होत
माझ्याकरता मात्र त्या, क्षणात सार जगण होत

खुळ होत मन माझ, खुळ त्याच वागण होत 
येणार नाहीस परत तरीही, तुझी वाट पाहण होत

वरून पाहता सार कस, शांत शांत होत कारण
मनामध्ये उठणार ते, वादळ फार शहाण होत

पुढे चालत राहण होता, प्राक्तनाचा भाग जरी
तरीदेखील वळणांवरती, उरून मागे राहण होत

आयुष्यात सोबतीला, सारच काही होत तरीही
सरतेशेवटी मात्र माझ, एकट एकटच राहण होत

-जीवा


Tuesday, May 22, 2012

खेळ

चालता चालता सहज दोन माणस भेटतात
आपापली खेळणी घेऊन नवा खेळ मांडतात
चार आसपासची लोकं त्यात हातभार लावतात
खेळ रंगतो ही चांगला
खुलतो ही चांगला
कधी कुणी जिंकत
कधी कुणी हरत
कुणी चीडीचा डावही खेळत
पण  खेळताना एकमेकांना
सावरूनही घ्यायचं असत हे ही कळत जात
नकळतच जीवाच जीवावाचून अडत जात
पण अचानकच नियतीचा डाव येतो
या तिसऱ्या गड्याला प्रत्येकजण विसरूनच गेलेला असतो
पण ती पासे फेकणे विसरत नाही, फेकतेच
कधी  पासे आपल्या बाजूने पडतात
आणि खेळ शेवटपर्यंत चालू राहतो
पण कधी पासे तिच्याबाजुने पडतात
आणि खेळ तिथेच संपतो
जाता जाता एक मात्र साक्षात्कार होतो
खेळ खेळासारखाच खेळायचा
अकारण त्यात जीव नाही गुंतवायचा
कारण...
जसा पायात पाय अडकून तोल जातो
तसा जीवात जीव अडकून जीव जायचा
मग मांडलेला तो पसारा
कुणी बर आवरायचा
दुसर कुणी येऊन त्यात नवा खेळ मांडला तर
तो ही खेळ असाच मोडायचा

- जीवनिका





Thursday, February 23, 2012

लाटा आणि भावना
यात काय फरक आहे
सागरात जशा लाटा
एकापाठोपाठ एक येताच असतात
तशा मनाच्या सागरात
भावना येत जातात
कधी हलक्या कधी मोठ्या
एका लाटे पासून दुसरी लाट
वेगळी करता येणार नाही
तसच एका भावनेपासून दुसरी भावना
वेगळी करता येण शक्य नाही
आयुष्याचा मार्ग हा असा एकच मार्ग आहे
ज्यावर चालत असताना माणसाला शेवट नको असतो.
हा मार्ग कधी संपूच नये अस वाटत.
या मार्गावर चालताना माणूस थकत नाही.
या शर्यतीत कधी कोणाला जिंकावस वाटत नाही.

Tuesday, February 21, 2012

मला अज्ञानीच राहू दे
अर्थ नको सांगूस लावायला
अर्थ न लावता
शिकायचय मला जगायला
बेधुंद होऊन चालायला
ठेचकाळले तरी पुन्हा उठायला
आणि वेड्यासारख पुन्हा
त्याच मार्गावरून चालायला
कुणी वेड म्हटलं तरी
त्यावर वेड्यासारख हसायला
पण नको सांगूस मला
त्या वेडेपणामागचा अर्थ मात्र शोधायला

मागे वळून मी पाहणारच आहे .......

पुढे जायचेच आहे
जाणारच आहे
पण तरीही मागे जाऊन
थोडावेळ थांबावे वाटणारच आहे

हरवलेल्या क्षणांची वाळू
हातात घेणारच आहे
भरलेली ओंजळ पुन्हा
रिती होणारच आहे

त्या वाळूचा किल्ला
बांधला जरी तरी
पुन्हा एकदा तो
मोडून पडणारच आहे

येणारी लाट सोबत
तुला नेणारच आहे
तरीही पुन्हा इथेच असशील
असे मला वाटणारच आहे

पाठमोराच तू
राहणार जरी नेहमी
तरीही मागे वळून मी
पाहणारच आहे

-जीवनिका

Monday, February 6, 2012

मना सांग रे ...

मना सांग रे
तुला मी कसे ओळखावे

कधी वाटतो तू वसंतापरी अन्
कधी हा असा सावळा रंगलेला

कधी होतसे मंद झुळूकेपरी तू
कधी का असे तू दिशाहीन वारा

कधी घेतसे झेप प्रकाशाकडे अन्
कधी का असे अंधार तुला भावलेला

मना सांग रे
नेहमी हे असेच का व्हावे
तुझ्यासवे नेहमीच का मी झुलावे
आधी फुलावे अन् मग कोमेजून जावे
मना सांग रे

-जीवनिका

Wednesday, February 1, 2012

स्वप्नांच गाव

का जुन्या स्वप्नांचा हात सोडून
आपण पुढे निघून जातो
आपण पुढे जातो
स्वप्नांचा गाव मागे राहतो
मग कधीतरी आपणच सजवलेल्या
त्य गावात आपण पुन्हा पाय ठेवतो
पण आपलाच तो गाव
आपल्याला परका वाटू लागतो
आपणच सजवलेला तो एक एक खेळ
मग लहानग्यांच्या भातुकलीच्या खेळा इतका
खुळा वाटू लागतो
पण तरीही क्षणभर का होईना
तो खेळ पुन्हा जगवा वाटतो
पण काही केल्या त्या जुन्या खेळात
आता गुंतता येत नाही
पुन्हा जुन्या स्वप्नांत आता हरवता येत नाही
मग वाटत
हीच का ती स्वप्न ज्यात आपण हरवलो होतो
त्याच का त्या स्वप्नासोबत
आपण क्षण अन क्षण जगलो होतो
विश्वास ठेवण तस जरा कठीणच होत
पण याही प्रश्नच उत्तर आपल्याकडेच असत
जुन्या त्या स्वप्नांची जागा
आपल्याच नव्या स्वप्नांनी घेतलेली असते
आणि आपणच नकळत आपल्या
जुन्या सोबत्यांची सोबत सोडलेली असते
म्हणूनच
आपल्याच जुन्या स्वप्नांचा गाव
आपल्यासाठी परका असतो
आणि आपल्याच त्या गावात
आपला मार्ग हरवलेला असतो

-जीवनिका