कधी कधी अनोळखीकडून ओळखीकडे होत असणारा प्रवास उलट दिशेने कधी सुरु होतो कळतही नाही.

Saturday, September 22, 2012

बांडगुळ

नकोय मला आधार
आधार मिळाला ना की बांडगुळ व्हायला होतं
आधाराला जखडून जायला होतं
प्रत्येक नवी पालवी फुटण्याआधी
आधाराकडे आशेने पहावं लागतं
नाही व्हायचय मला बांडगुळ
आणि तुझाही आधार वृक्ष होऊ द्यायचा नाहीये
नाही तर आधार देता देता
आधार वृक्षच कोलमडून पडायचा
मग त्यावर जगणारं बांडगुळ तरी
कसं उभं राहणार
म्हणून
नाही व्हायचय मला बांडगुळ
आणि तुझाही आधार वृक्ष होऊ द्यायचा नाहीये
तुला बहरताना पहायचय
आणि माझा आधार मात्र मलाच व्हायचय

-जीवा


Sunday, September 9, 2012

व्यर्थच

जगण्याचा अर्थ शोधता, मरणाचे ते भय ठरले
मरणाचा अर्थ उमगता, जगणे ते व्यर्थच ठरले

नसण्यासम असणे होते, क्षणभर ते जगणे होते
जगण्याचा अर्थ हरवता, असणे ते व्यर्थच ठरले

काळासव घडले काही, जगण्यातून कळले काही
पण सारे अर्थ हरवले, कळणे ते व्यर्थच ठरले

- जीवा

गझल  लिहिण्याचा प्रयत्न केला होता पण जमला नाही.