कधी कधी अनोळखीकडून ओळखीकडे होत असणारा प्रवास उलट दिशेने कधी सुरु होतो कळतही नाही.

Saturday, November 1, 2014

न लिहिलेलं पत्र, एका न उलगडलेल्या नात्याला

प्रिय नात्यास , 

अशा एका नात्यास, जे अगदी नकळत जुळलं. इतर कोणत्याही नात्यांपेक्षा ज्याची वीण घट्ट आहे अस एक नातं. ज्या नात्याने मला नकळत खूप काही दिलं. त्या नात्यासाठी हे पत्र. 

 खूप सारी नाती आपल्याभोवती 'पडलेली' असतात. जन्मापासून आपल्यासोबत बांधलेली असतात. पण हक्काने हाक मारावी अस एकाही नातं त्यात नसावं यासारखं दुःख नाही. पण तुझ्याशी असलेल हे नातं वेगळ आहे. लहानपणापासुनच सवयीने मी कधी कोणाला साधी हाक सुद्धा मारली नाही  पण तु भेटल्यानंतर का कुणास ठाऊक तुला हक्काने थांबवून घेत राहिले, तुझ्याशी गप्पा मारत आले. तुझ्याशी बोलताना हलकं वाटायचं, डोक्यातला गुंता मोकळा झाल्यासारखा वाटायचा. का असं वाटलं कुणास ठाऊक पण तुझ्याशी बोलताना उगाच लहान झाल्यासारख वाटायचं. नेहमी वाटलं, मी कितीही वेडेपणाने वागले तरी तु समजून घेशील. मोठेपणाच,समजूतदारपणाच अवेळी आलेल ओझ अगदी नकळत उतरत गेलं. तु मला हसायला शिकवलसं. हा अमूल्य ठेवा आयुष्यभर असाच राहील माझ्याजवळ . 

काही देऊ शकत नाही मी तुला, तुझ्यापेक्षा लहान आहे. पण देवाजवळ तुझा आनंद नक्की मागत राहीन एवढ मात्र खरं .

No comments:

Post a Comment